Categories: diary

५ रात्रींची कथा

गेल्या विकेंडला मला थोडे बरे नव्हते. डोकेदुखी, दातदुखी, घसादुखी अशी बरीच दुखणी एकदम आली. शनीवार रात्र अजिबात झोप लागली नाही. रविवारी दिवसा बराच काळ झोप भरून काढण्यात गेला. माझा मुलगा त्या दिवशी सरप्राईझिंगली छान राहीला. एकदाही आईच पाहिजे म्हणून रडला नाही. बाबाबरोबर एकदम व्यवस्थित राहीला. नाहीतर पूर्वी आई दिसली नाही ५ मिनिटं की शोधमोहिम चालू. तसे झाले नाही. मला रविवारी जरा बरे वाटू लागल्यावर ह्या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले! मनात म्हटले अरेवा! २०१६ ची सुरूवात छानच झाली! लिटल डिड आय नो, ती वादळापूर्वीची शांतता होती.

रविवारी रात्री नेहेमीचे बेडटाईम रूटीन आंघोळ, दुध-पाणी, स्टोरीटाईम इत्यादी चालू झाले, मग मात्र आख्खा दिवस छान राहिलेल्या मुलाने इंगा दाखवायला सुरूवात केली. डायपर बदलून घेईना. चिडचिड/ किरकिर चालू. हळूहळू रडण्यात रूपांतर. बर्‍याच कष्टाने त्याला बेडरूममध्ये नेऊन झोपवला एकदाचा ९:३० ला. हुश्श केले व वरणभात खाऊन घेतला अन मी ही झोपले १०-१०:३०ला.

२:३० वाजता मुलाने मला उठवले व नेहेमीप्रमाणे दुध दे पाणी दे असे हातवारे, पॉईंट करणे चालू केले. जनरली तो रात्री अजुनही एकदा किंवा दोन्दा उठतोच ह्या कारणासाठी. अलिकडे सर्दी, खोकला दोनदा होऊन गेल्याने नेहेमीप्रमाणे त्याचे खाणे अफेक्ट झाले व आमची जेवणाची बॅटल परत चालू झाली आहे. बरेच दिवस फक्त पिडीयाशुअर पिऊन काढल्यावर आता हळूहळू चकली खाण्यापर्यंत प्रगती झाली आहे. तर ह्या सर्व कारणांमुळे त्याचे पोट भरत नाही व रात्री तो उठतोच. पण सोमवारी पहाटे २:३० ला उठला दुध पाणी मागितले पण प्यायले काहीच नाही. अर्धवट झोपेत रडायला लागला. त्याला बोल म्हटले की घशातून आवाज फुटत नाही पण मध्यरात्री, वेळी अवेळी रडताना मात्र आवाज टिपेला असतो. माझे आजारी व झोपेतले डोके अचानक खडबडून जागे झाले व त्याला शांत करण्याच्या मागे लागले. त्याचे पिक्चर कम्युनिकेशन बुक त्याच्यासमोर नाचवून काय हवे विचारले. अर्धा पाऊण तास भरपूर रडून झाल्यावर त्याने आयपॅड मागितला व नेहेमीप्रमाणे आयपॅडवर काहीतरी अ‍ॅप सुरू करून घरात पळापळी व आरडाओरडा चालू केला. (गॉड ब्लेस अवर डाउन्स्टेअर्स नेबर्स!) घरात कितीही रडाअरड व गोंधळ घातला तरी माझा मुलगा शाळेला अगदी आनंदाने व झटकन तयार होऊन जातो. तसा तो गेला. व ४ ला परत झोपेत आला. कारण शाळेत अजिबात झोपला नव्हता. पहाटे २:३० पासून जागा असणारा मुलगा दुपारचे ४ वाजले तरी झोपला नाही पाहून मी त्याचे संध्याकाळचे एबीए थेरपीचे सेशन कॅन्सल केले व त्याला झोपू दिले. व ६:३० ला बळंबळं उठवले. नाहीतर रात्रीच्या झोपेची पंचाईत.

इतक्या काळज्या घेऊनही मुलगा रात्रीच्या वेळी, बेडटाईम आला की इरिटेट होतच होता. सोमवारी रात्री १ तास रडला बिफोर बेडटाईम. आयपॅड हवा म्हणे. मंगळवारी पहाटे ५ ला उठला रडत रडत. मंगळवारी शाळेतून झोपून आला. पण त्याला उठवणे भाग होते कारण सारखे थेरपीज बुडवणे चालण्यासारखे नव्हते. बळंबळं उठवल्याने अजुन त्रासला. मंगळवारी रात्री परत झोपायला त्रास. रडणं. डोक्यावर हात मारून घेणे. डायपर बदलतेवेळी मला लाथा मारणे. हळूहळू मला संध्याकाळ उलटून गेली की टेन्शन बिल्ड अप व्हायला लागले. मी थोडा विचार करता असे जाणावले की शनी-रवी-सोम मी थोडी जास्त माझ्या आजारपणाने त्रस्त होते व नेहेमीसारखी त्याच्याबरोबर खेळत वागत नव्हते. म्हणून बुधवारपासून मी खूप जाणिवपूर्वक बदल केले वागण्यात. त्याच्या आवडीची गाणी लावून नाचलो. बेडवर उड्या मारल्या. आंघोळीच्या वेळी भरपूर साबणाचा फेस केला.. पण तरीदेखील आंघोळीनंतर डायपर लावायला गेले तर अतोनात लाथा मारल्या व बेडटाईम रूटीन बद्दल असंतोष व्यक्त केला. बुध-गुरू इतके सगळे करून देखील त्याचे तँट्रम्स अजिबात कमी झाले नव्हते. हळू हळू माझे डोके बधिर होत गेले. अर्धवट झोपेत राहून राहून आता माझे डोळे इतके लहान झाले आहेत की मला लोकं चायनिज समजातात. किंवा मला क्रोनिक स्लीप डिप्रायव्हेशन्चा आजार आहे इत्यादी जोक्स मारू लागले मी. पण परिस्थिती अजिबातच सुधारत नव्हती.

गुरूवारी रात्री तर मुलाने वर्स्ट एव्हर मेल्टडाउन काय असते त्याचे प्रात्यक्षिक केले. बेडटाईमच्या वेळेस २-२.५ तास प्रचंड रडारड व अ‍ॅग्रेशन. पण ह्यावेळेस कुठेतरी रँडमली रूममध्ये बोटं दाखावणे चालू केले होते. आता मात्र माझा पेशन्स संपत चालला होता. अरे तुला काय हवंय? दुध वं की पाणी हवं? निळी बाटली हवी की लाल? डायपर का घालून घेत नाहीस? रॅश आला का? क्रिम लाऊदे.. लाथा मारू नकोस. थंडी वाजतेय का? स्वेटर घाल. उकडतय काय? स्वेटर काढ. कितीतरी पर्म्युटेशन कॉंबिनेशन्स केली पण काही नाहीच. कसाबसा रडून थकून झोपून गेला. परत ३:३०-४ ला उठून रात्रीचे रडणे कंटीन्यू केले.

ह्या सर्व गडबडीत शाळेला छान जातो, कधी नव्हे ते सर्वच्या सर्व शिक्षक, थेरपिस्ट त्याच्या नवनवीन स्किल्सबद्दल कौतुक करत आहेत. एकंदरीत खुष आहेत. ह्याच आठवड्यात त्याने इतक्या नव्या गोष्टी केल्या. सो मेनी फर्स्ट्स. थेरपिस्ट्सना स्वतःचा स्वतः टायमर संपल्यावर आयपॅड दिला, थेरपीज्च्या ठिकाणी त्याचा जिवश्चकंठश्च मिकी माऊस त्याने इतर मुलांबरोबर शेअर केला.. आयुष्यात प्रथम मोठ्या मुलांचा झोपाळा ट्राय केला. आईच्या कारमध्ये ड्रायव्हर्स सीटवर बसून व्हील हातात धरून कार चालवायचे प्रिटेंड प्ले तर पहिल्यांदा केले त्याने. इतके सगळे छान चालू असताना हा झोपायच्या वेळेला का असा करतो हे कोडेच होते.

शुक्रवारी मी आमच्या बेडरूमची हलवाहलव केली. माझ्या मुलाला त्याची गादी जरा कोपर्‍यात बंदिस्त ठिकाणी असलेली आवडत आली आहे. त्याला ते सेफ व कोझी वाटत असावे बहुतेक. अर्थात मला त्याला फ्लेक्झिबल बनवायचे असते म्हणून मी त्याही जागा बदलते सारख्या. पण आज मात्र त्याच्या मनासारखे होणे गरजेचे होते. त्याची गादी, आमचा बेड असे सर्व हलवले. व त्यालाही ते आवडले. येऊन बेडवर उड्या मारून गेला. मात्र बेडटाईमला बोटे कुठ्तरी दाखवून रडणे चालूच. केवळ रडणे नाही तर डोक्यावर हात थडाथडा मारून घेणे.. लाथा मारणे.. इतरांप्रती अ‍ॅग्रेसिव्ह बिहेविअर वगैरे. खूप झोप आली होती खरंतर त्यालाही. त्यामुळे तो बेडवरच होता, आडवाही होत होता पण लगेच उठून रूमच्या एका दिशेला पॉईंटींग. शेवटी मी तो कोपरा सगळा धुंडाळायला लागले. त्याला नक्की काय बॉदर होत आहे ते कळत नसल्याने, मी रूमचे पडदे उतरवले.. भिंतीवरचे घड्याळ काढले, फ्लोअर लँपची जागा बदलली.. बुकरॅकवरची पिशवी लपवली.. तरीही नाहीच.

आणि… देन.. इट डॉन्ड ऑन मी.. मला कारण समजले! मुळात ह्या सगळ्या वागण्याला अ‍ॅक्चुअली कारण होते! अन ते मला शोधता आले!!
झाले असे होते. गेल्या आठवड्यात आमचा इस्त्री करायचा आयर्निंग बोर्ड बिघडला. तो फोल्डच होईना. त्यामुळे तो उघडलेल्याच अवस्थेत आम्ही ठेवायला लागलो होतो. मुलाला त्यावर क्लाईंब करणे , त्याच्यावर उभे राहणे.. सर्फबोर्ड असल्याप्रमाणे झोपून राहणे हे सर्व आवडत होते. परंतू तिथे आमच्या रूमची बाथरूम असल्याने जायला यायला अडथळा येत होता. म्हणून मी तो उघडलेल्याच अवस्थेत तो उभा करून ठेवला होता. जेणेकरून जागा कमी व्यापली जाईल. हेच ते कारण!! आयर्निंग बोर्ड आडवा केल्याबरोब्बर रडणे थांबले. पाणी मागितले प्यायला व दुसर्‍या क्षणाला झोपून गेला. ते सकाळी ८ ला उठला! (अर्थात आज सकाळ ४ ला झाली. पण निदान रडकी, टँट्रम्सवाली नव्हती ती. रेग्युलर झोपेतून उठल्यावर परत झोपेसाठी फोकस न करता आल्याने, आयपॅडची आठवण आल्याने जे उठणे असते ते होते ते. )

पण ह्या सर्वामुळे एक समजले. आमचा मुलगा मुळात तसा उगीच रडत नाही. त्याची जुनी थेरपीस्ट म्हणायची त्याप्रमाणे प्रत्येक बिहेविअरला कारण असते. ते कारण आम्हाला कळत नसल्याने त्याची चिडचिड होते. त्या फ्रस्ट्रेशन वाढतच जाते ते एक म्हणजे त्याला शब्द बोलून सांगता येत नाही पटकन.. मोस्ट ऑफ द टाईम्स तो अशा गोष्टी कम्युनिकेट नाही करू शकत. जरी पॉईंटींग वगैरे केले तरी ते खूप रँडम आहे. अन दुसरी गोष्ट.. महत्वाची गोष्ट! आडवा आयर्निंग बोर्ड उभा ठेवला ह्या छोट्याश्या गोष्टीला तो अ‍ॅक्सेप्ट करू शकत नव्हता. बदलाशी जुळवून घेणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे त्याच्यादृष्टीने. कदाचित तो उभा आयर्निंग बोर्ड त्याला एखाद्या मॉन्स्टरसारखा देखील वाटत असेल. कारण तो अजिबात त्याच्याजवळ जात नव्हता. तो इझीली बोर्ड स्वतः आडवा करू शकला असता.

अशी ही ५ रात्रींची कहाणी. मुलं रडतातच, हट्ट करतातच. त्याबदल काहीच म्हणणे नाही. पण ही कहाणी म्हणजे पर्फेक्ट उदाहरण आहे ऑटीझम म्हणजे काय ह्याचे. किती छोट्या गोष्टी ह्याला बॉदर होऊ शकतात व त्या आम्हाला न समजल्याने कसा राईचा पर्वत होऊन बसतो ह्याचे.

au-some-mom

Recent Posts

पोळीबंद आहार!

खूप पूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे फारच जुनी. तेव्हा चाकाचा, अग्नीचा, शेतीचा, चित्रकलेचा कशाचाही शोध लागला नव्हता. अश्मयुग. दोन वेळच्या जेवणाची…

8 years ago

Vaccines व स्वमग्नता

प्रश्न: Vaccines व स्वमग्नता ह्याचे नक्की काय रिलेशन आहे? ह्यात काही अर्थ आहे? कि autism पालकांची व्यर्थ भीती? माझ्या हाताशी…

9 years ago

ऑटीझम कॉन्फर्न्सचा अनुभव, ग्लुटेन आहारात असण्याचे दुष्परिणाम इत्यादी.

मी नुकतीच एका 'ऑटीझम कॉन्फरन्स'ला जाऊन आले. http://tacaautismconference.com/ कॅलिफॉर्नियातील कोस्टा मेसा ह्या गावात ही कॉन्फरन्स आयोजित केली होती. आयोजक होते,…

9 years ago

Special Olympics World Summer Games – LA 2015

तुम्हा सर्वांना 'ऑलिम्पिक्स' माहीत असेलच! जसं ऑलिम्पिक्समध्ये सर्व जगभरातून खेळाडूंसाठी वेगवेगळे क्रीडाप्रकार असतात, त्याच प्रमाणे 'स्पेशल ऑलिम्पिक्स' मध्ये सर्व जगभरातून…

9 years ago

… And he ‘said’ I Love You !

सर्वांना येऊ घातलेल्या मदर्स डेसाठी शुभेच्छा!! मी जी गोष्ट सांगत आहे ती तशी झाली १५ दिवस जुनी. पण ह्या मदर्स…

9 years ago

‘ब्रेन ऑन फायर’ – पुस्तक परीक्षण

***** ज्यांना पुस्तक वाचायचे आहे, त्यांच्यासाठी स्पॉयलर अलर्ट ***** माझ्या मुलाच्या ऑटीझममुळे माझा वाचनाचा प्रकारच बदलून गेला आहे. दोन वर्षापूर्वी…

10 years ago